‘नामदार’, ‘भारताचा हिरा’ अशा विविध उपाधी मिळालेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म १८६६ साली गुहागर मधील कोतलुकमध्ये झाला. लहानपणापासून अभ्यासात अतिशय हुशार आणि इंग्रिजीवर विलक्षण प्रभुत्व. कोल्हापूर, पुढे पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि मग मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं. काही काळ मुलांच्या शिकवण्या घेऊन त्यांनी शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव गोखल्यांवर पडला. रानड्यांचे मानसपुत्र म्हणूनही गोखल्यांना ओळखलं जाई. गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना गोखल्यांना नोकरी, कुटुंब, ‘आपण बरे, आपले काम बरे’ हा विचार पटला नाही. ज्या देशात जन्म मिळाला आहे त्या देशासाठी आपण काहीतरी करायला हवं ही भावना कायम होती.
न्यायमूर्ती रानडे, टिळक, आगरकर, दादाभाई नवरोजी अशा समकालीन विचारवंतांसोबतच जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल, एडमंड बर्क अशा पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव गोखल्यांच्या विचारांतून दिसत असे. पुढे काँग्रेस मध्ये ते ‘मवाळवादी’ या गटाचा महत्वाचा भाग होते. १९०५ साली, काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. भारतातील तत्कालीन शिक्षण व्यवस्था ही भारतीयांसाठी पुरेशी नाही या विचाराने ही संस्था अस्तित्वात आली. राजकीय शिक्षणाशिवाय राजकीय बदल होऊ शकत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. या संस्थेच्या कार्याअंतर्गत ग्रंथालयं उभारणं, शाळा स्थापन करणं आणि कामगारांसाठी रात्री शिकवण्या घेणं असे विविध उपक्रम राबवले गेले. याच बरोबर, युवकांनी सनदशीर पद्धतीने राष्ट्रीय हितासाठी झटावे, लोकांमध्ये जागृती निर्माण करावी हा या संस्थेचा नेम होता.
‘सनदशीर’ हा शब्द मवाळवाद्यांची ओळख झाली होती. ‘प्रेयर्स अँड पेटिशन्स’ ची पद्धत गोखल्यांनी अवलंबली होती. त्यांच्या धारणांमध्ये उठाव, संप, असहकार चळवळ बसत नसे. गोखल्यांनी इंग्रजांपर्यंत आपल्या तक्रारी पोहचवणे, मवाळ गटाच्या अपेक्षा आणि मागण्या सांगणे, शिफारशी मांडणे आणि संवाद साधणे हा मार्ग आयुष्यभर अवलंबला. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे – १८९७ साली वेलबी कमिशन समोर गोखल्यांनी भारतातील आर्थिक दुःस्थिती, त्याची कारणं आणि त्यावरील शिफारशी अतिशय प्रभावी पद्धतीने मांडल्या. याचा परिणाम म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर लादलेलं आर्थिक ओझं काही प्रमाणात कमी केलं. ब्रिटिशांनी जो उदारमतवाद ब्रिटनमध्ये पाळला होता, तोच त्यांनी भारतात लागू करावा आणि पाळावा अशी गोखल्यांची अपेक्षा आणि मागणी होती. ब्रिटिशांचं बोट धरून भारताला उदारमतवादाकडे नेणं हा काँग्रेस मधील मवाळ मंडळींचा मानस होता –
दलितांचे, मागासवर्गीयांचे सशक्तीकरण, हिंदू-मुसलमान एकता या स्तंभांवर सशक्त भारत उभा राहेल यावर काँग्रेस मधल्या सगळ्यांचं एकमत होतं. मात्र, ब्रिटिशांचा हस्तक्षेप असावा की नाही, असेल तर तो कुठे आणि किती असावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताच्या विकासासाठी काय मार्ग अवलंबले जावेत यावर काँग्रेस मध्ये वादंग होऊन, १९०७ साली सुरत मधील अधिवेशनात काँग्रेस दुभंगली. भारतीयांचे दमन हेच ज्या राज्यकर्त्यांचे ध्येय आहे त्या राज्यकर्त्यांशी संवाद साधून भारतीयांना अधिकार, स्वातंत्र्य कसे मिळणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न मवाळ गटात नसलेल्या नेत्यांचा होता. जे अधिकार ब्रिटिश नागरिकांना ब्रिटन मध्ये आहेत ते अधिकार भारतीयांना भारतात नाहीत; आणि भारतीयांना ते समान अधिकार कधीही मिळू नयेत यासाठी ब्रिटिश अधिकारी कार्यरत असताना, ‘प्रेयर्स अँड पेटिशन्स’ चा काय उपयोग या प्रश्नाला अनेकांकडे उत्तर नव्हतं. वर्णद्वेष आणि अंकुश नसलेल्या सत्तेमुळे वाईसरॉय लॉर्ड कर्झन उन्मत्त झाला होता. १९०५ साली भारतीयांच्या विरोधाला न जुमानता लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा प्रस्ताव मांडला. अशा परिस्थितीत ब्रिटिशांची सत्ता भारतीयांच्या हिताची ठरू शकते हे भारतीयांना पटवून देणं मवाळ गटाला कठीण झालं. गायत्री पगडी यांच्या लोकमान्य टिळकांवरील पुस्तकातल्या एका उल्लेखाप्रमाणे जनसामान्यांनी भारताच्या लढ्यात पडू नये; काही निवडक बुद्धीजीवींनी भारत आणि ब्रिटन मधला दुवा बनावे असे गोखल्यांचं मत होतं . या उलट टिळक, ऑरोबिंदो, लाला लाजपत राय यांनी भारताच्या लढ्यात सामान्य माणसांना सामील करून घेणं आणि ब्रिटिशांपेक्षा भारतीय जनतेशी संवाद साधणे यावर जोर दिला.
गोखल्यांची इच्छा होती की काँग्रेसमध्ये पडलेली फूट दूर व्हावी आणि साऱ्या गटांनी एकत्र यावे. ही इच्छा मात्र त्यांच्या जीवनकाळात पूर्ण होऊ शकली नाही. १९१५ मध्ये वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी गोखल्यांचे निधन झाले. तदनंतर १९१६ सालच्या लखनौ अधिवेशनात काँग्रेसमधले सगळे गट एकत्र आले. गोखल्यांनी खऱ्या अर्थाने उदारमतवाद अंगीकारला होता. राजकीय विरोधकांना योग्य तो आदर देत त्यांनी आपले विचार मांडले. कितीही वैचारिक मतभेद असले तरी प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे या तत्वावर त्यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला. आणि काँग्रेस अध्यक्ष असतानाही सत्तेचा गैरवापर केला नाही. तत्वनिष्ठता आणि आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं हा विचार आणि तसाच आचार हे गोखल्यांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू होते. त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्याविषयी नितांत आदर आणि प्रेम होतं. गोखल्यांच्या मृत्यूनंतर जहाल गटाचे नेते असलेल्या टिळकांनी केसरीतून उदारमतवादाचे अग्रणी पुढारी असलेल्या गोखल्यांना आदरांजली अर्पण केली.
Profile of the author
Avanti Lele